photo 71509303 - ‘प्रेसिडेंट कलर’ सोहळा आज

‘प्रेसिडेंट कलर’ सोहळा आज

ठळक बातम्याphoto 71509303 - ‘प्रेसिडेंट कलर’ सोहळा आज

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार समारंभ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे बुधवारी (दि. ९) रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये आगमन झाले. ओझर विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पालकमंत्री गिरीश महाजन आणि देवळाली लष्कराचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारिया यांनी स्वागत केले. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पुणे महामार्गावरील कॅट येथे गुरुवारी (दि. १०) सकाळी ‘प्रेसिडेंट कलर’ सोहळा होणार आहे. तसेच, स्कूल ऑफ आर्टिलरी येथे संग्रहालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. दरम्यान, राष्ट्रपतींचा मुक्काम विश्रामगृहावर असल्याने या परिसरात नियुक्त अधिकाऱ्यांव्यतीरिक्त इतरांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे.

आर्टिलरी सेंटर आणि देवळाली कॅम्प येथे सैन्य दलाच्या दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने राष्ट्रपती कोविंद यांचे बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त राजाराम माने, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदींनी त्यांचे स्वागत केले. तेथून ते वाहनांच्या ताफ्यात चांडक सर्कल जवळील सरकारी विश्रामगृहावर पोहोचले. या कालावधीत अन्य वाहनांसाठी रस्ते बंद ठेवण्यात आले. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे या परिसरातही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. विश्रामगृहासमोरील चांडक सर्कल ते गडकरी चौकापर्यंतचा रस्ता सायंकाळीच बंद करण्यात आला. गुरुवारी कार्यक्रमांच्या निमित्ताने कोविंद यांचा दिवसभर नाशिकमध्येच मुक्काम असणार आहे. कोविंद यांचा बुधवारी रात्री विश्रामगृहावर मुक्काम असल्याने विश्रामगृह परिसरात येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला. विश्रामगृहालगतचे पर्यटन महामंडळाचे कार्यालय ते विश्रामगृहामागील म्हसोबा मंदिर रस्त्यावर वाहनांसह पादचाऱ्यांना ये-जा करण्यास पोलिसांनी बंदी घातली. गुरुवारी १० ऑक्टोबरला सायंकाळपर्यंत ही बंदी कायम असणार आहे. वाहनचालकांना चांडक सर्कल, तरणतलाव त्र्यंबक रोड या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येणार आहे. गुरुवारी (दि.१०) सकाळी सव्वा आठनंतर राष्ट्रपतींचा ताफा सरकारी विश्रामगृहावरून द्वारकामार्गे उपनगर येथील कॅट येथे पोहोचेल. ताफा मार्गस्थ होईपर्यंत पाच ते दहा मिनीटांसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. या कालावधीत नागरिक पर्यायी मार्गांचा अवलंब करू शकतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

असा रंगणार सोहळा

लष्करी हवाई दलाला अत्यंत मानाच्या प्रेसिडेंट कलर (राष्ट्रपती ध्वज) देऊन सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी हेलिकॉप्टर्सच्या कवायती आणि जवानांचे देखणे संचलन संपन्न होणार आहे. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल कन्वल कुमार यांची उपस्थिती राहणार आहे. तर, कॅटचे कमांडंट ब्रिगेडिअर सरबजीतसिंग बावाभल्ला हे परेडचे नेतृत्त्व करणार आहेत. या सन्मानामुळे प्रेसिडेंट कलर प्राप्त झालेल्या अत्यंत मोजक्या संस्थांमध्ये लष्करी हवाई दलाचा समावेश होणार आहे.

विश्रामगृहावर तीन तास विश्रांती

देवळाली कॅम्प येथील रुद्रनाद संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा सरकारी विश्रामगृह येथे पोहोचतील. दुपारी १ ते ४ या काळात ते विश्रामगृहावर विश्रांती घेणार आहेत. दुपारी चारनंतर ते ओझरकडे मार्गस्थ होतील. तेथून विशेष विमानाने ते म्हैसूर (कर्नाटक) येथे कार्यक्रमासाठी प्रयाण करणार आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *