photo 71493860 - यंदा पाहुणे घटणार!

यंदा पाहुणे घटणार!

ठळक बातम्याphoto 71493860 - यंदा पाहुणे घटणार!

यंदा पाहुणे घटणार!

महापूर आणि अतिवृष्टीमुळे नांदूरमध्यमेश्वरला पक्ष्यांचा किलबिलाट कमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्राचे भरतपूर असलेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दिवाळीनंतर येणाऱ्या पाहुण्यांची संख्या यंदा घटणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पक्ष्यांच्या आगमनावर त्याचा परिणाम होणार असून स्थानिक पक्षीदेखील स्थलांतरित झाले असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच येथील पक्ष्यांच्या किलबिलाट कमी होणार असल्याने पर्यटनालाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.

दरवर्षी दिवाळीनंतर म्हणजेच, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी देश-विदेशातील पक्षी नांदूरमध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात दाखल होतात. मात्र, यंदा सर्वत्र पावसाने तडाखा दिल्याने पक्ष्यांच्या आगमनावर त्याचा परिणाम होणार आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा पूरस्थिती सातत्याने निर्माण झाल्याने खाद्य आणि पाणवेली वाढल्या आहेत. परतीच्या पावसामुळेही जिल्ह्यात पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. राज्याच्या विविध भागात पर्जन्यमान चांगले असल्याने परदेशी पक्ष्यांना अन्य पाणथळेही उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नांदूरमध्यमेश्वरचे तळ गाठणाऱ्या पक्ष्यांना अन्य पाणथळी खुणावणार आहेत. सहाजिकच नांदूरमध्यमेश्वरकडे पक्ष्यांचा ओघ कमी राहणार आहे. दरवर्षी या अभयारण्यात देश-विदेशातील हजारो पक्ष्यांचे आगमन होत असले, तरी यंदा त्या आनंदावर विरजण पडणार असल्याचे निरीक्षण पक्षी निरीक्षकांनी नोंदविले आहे.

थापट्या, गढवाल, तरंग, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, पिनटेल कोंबडक, मुर हेन, छोटा मराल, ऑस्प्रे, काईट, मार्श हॅरिअर, ईगल, पेटेंड स्टॉर्क, प्लासगल, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, स्पून बिल, स्पोटेड ईगल यांसारखे अनेक पाहुणे यंदा कमी असतील. युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका, शेजारील आशियाई देशातून येणाऱ्या या पक्ष्यांची संख्या यंदा निश्चित घटणार असून, गेल्यावर्षी सुमारे ४५ हजार पक्ष्यांचे नोंदविलेले निरीक्षण यंदा अवघे २० ते २५ हजारांपर्यंत असेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

नांदूरमध्यमेश्वरची पाच वर्षांतील पक्षी संख्या

२०१५ – ४२,४४४

२०१६ – ३८,४३४

२०१७ – ३१,३५०

२०१८ – ३९,६००

२०१९ – ४५,४३४

१९८२ पासूनचा अभ्यास लक्षात घेता, या वर्षी पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यंदा ज्या ठिकाणी कधी पाणी साचत नव्हते, त्या ठिकाणी देखील साचल्याचे दिसले आहे. त्यामुळे स्थानिक पक्षीदेखील स्थलांतरित झाल्याचे दिसते. पाण्याची पातळी जास्त असून यंदा सर्वाधिक पाऊस झाल्याने त्याचा परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर निश्चितच जाणवेल.

– दत्ता उगांवकर, पक्षी निरीक्षक

यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर शिवाय विविध ठिकाणी पाणवनस्पती वाढल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांना अनेक ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊ शकते. फ्लेमिंगो आणि क्रेन या परदेशी पाहुण्यांची संख्याही यंदा कमीच असेल. बदकांच्या प्रजातींवरही याचा विशेष परिणाम जाणवणार आहे.

– सतीश गोगटे, पक्षी निरीक्षकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *