photo 71510929 - jalgaon news News: महायुतीला शह देण्यासाठी तडजोड 
alliance with mns in some constituency, says sharad pawar |
Maharashtra Times

jalgaon news News: महायुतीला शह देण्यासाठी तडजोड alliance with mns in some constituency, says sharad pawar | Maharashtra Times

मराठी बातम्या


म. टा. प्रतिनिधी, जळगाव: विधानसभा निवडणुकीत भाजप
आणि शिवसेनेला शह देण्यासाठी आम्ही राज्यातील काही मतदारसंघांमध्ये
जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघातदेखील
त्यासाठीच जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार घेतल्याची
माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. या
वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेले शिवसेनेचे बंडखोर
उमेदवार चंद्रकांत पाटीलदेखील उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी बुधवारी (दि. ९) सकाळी
पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी ही माहिती
दिली. शरद पवार पुढे म्हणाले, काही मतदारसंघांमध्ये आम्हाला असे
वाटले की जर आम्ही त्याठिकाणी निवडणूक लढवली तर भाजप आणि शिवसेनेला
अप्रत्यक्षपणे मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि
शिवसेनेला शह देण्यासाठी आम्ही राज्यातील काही मतदारसंघांमध्ये
जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत. त्यात दोन ते तीन ठिकाणी मनसेचे
उमेदवार आहेत, असेही पवारांनी सांगितले.

आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे घसरते दर, वाढती
महागाई, तरुणांची बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था असे असंख्य
प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत
आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विकासाच्या बाबतीत काहीही
घडले नाही, त्यामुळे ३७० कलमाचा भाजपकडून होणारा पुनरुच्चार
म्हणजे, त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नसल्याने लोकांच्या
भावनेला हात घालण्याचा प्रयत्न आहे, असे पवार म्हणाले.

लोकसभेची निवडणूक वेगळ्या मुद्यांवर झाली. त्यावेळी पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून त्याची
प्रामुख्याने मांडणी केली. ज्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा
येतो तेव्हा लोक वेगळ्या विचाराने जातात. त्याचाच लाभ लोकसभेत
सत्ताधाऱ्यांना झाला. मात्र, नंतर लोकांच्या लक्षात आले की या
मुद्यांमध्ये काहीही तथ्य नाही. म्हणूनच लोकसभेनंतर मध्य प्रदेश,
राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला लोकांनी
नाकारले. त्यामुळे उद्या महाराष्ट्र आणि हरियाणात सत्तांतर झाले
तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही पवारांनी या वेळी सांगितले.

प्रगत जळगाव जिल्हा दुर्लक्षित

पूर्वी जळगाव जिल्हा हा प्रगत होता. राज्यभरात जळगाव जिल्ह्याच्या
विकास पॅटर्नची चर्चा असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत जिल्हा
दुर्लक्षित जिल्ह्यामध्ये गणला जात आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची
परिस्थिती भयानक असल्याचा स्वत: अनुभव घेतल्याचे ते म्हणाले.
जळगाव-औरंगाबाद, जळगाव-धुळे तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची
दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर जिल्ह्याची अर्थव्यवस्था अवलंबून
असते. अशा रस्त्यांमुळे जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्थादेखील
खिळखिळी झाल्याचे ते म्हणाले. गडकरी यांनी जिल्ह्यातील
रस्त्यांसाठी तसेच मुख्यमंत्री यांनी शहरातील रस्त्यांसाठी मोठा
निधी दिल्याच्या घोषणा केल्या होत्या. कदाचित त्याचमुळे
रस्त्यांची दुरवस्था झाली असावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प त्यात बलून बंधारे, मेगा रिचार्ज
अपूर्ण असल्याने तसेच केळी उत्पादकांसाठी रेल्वे वॅगन्स उपलब्ध
नसल्याने शेतकरी अस्वस्थ असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेने पाच वर्षे काय केले?

मुंबईत नुकताच शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. या वेळी बोलताना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे सरकार आल्यास
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची घोषणा केली आहे. मग, त्यांनी
गेल्या पाच वर्षांत काय केले असा टोला पवार यांनी ठाकरेंना
लगावला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *